Thursday, October 27, 2011

घटनेचे शिल्‍पकार बाबासाहेब आंबेडकर

पुस्‍तकाचे नावः घटनेचे शिल्‍पकार बाबासाहेब आंबेडकर
लेखकः किशोर गायकवाड
प्रकाशकः श्री गंधर्व वेद प्रकाशन, पुणे
मूल्‍यः रु. 160/-

श्री गंधर्व वेद प्रकाशनाच्‍या महाराष्‍ट्र चरित्र ग्रंथमालेमधील हे पुस्‍तक आहे. बाबासाहेबांचे संक्षिप्‍त चरित्र समजून घेण्‍यासाठी हे पुस्‍तक मार्गदर्शक ठरते. आपल्‍याला अनेक गोष्‍टी माहीत असतात. तरी देखील त्‍या गोष्‍टींच्‍या खोलात शिरुन माहिती मिळविण्‍याचा आपण कधी प्रयत्‍न करीत नाही. आपल्‍याला एखाद्या विषयावर दहा ओळी लिहून काढा किंवा 4 मिनिटे बोला असे सांगितले तर आपल्‍याला माहिती असलेल्‍या गोष्‍टी किती आणि माहिती आहेत असे वाटणा-या गोष्‍टी किती यामधील फरक स्‍पष्‍ट होतो. आपल्‍याला बाबासाहेब आंबेडकर माहीत असतात तरी देखील त्‍यांचे चरित्र संक्षिप्‍त का होईन आपल्‍या नजरेखालून गेलेले नसते. आपल्‍याला रियासतकार सरदेसाई माहित असतात पण त्‍यांचे देखील चरित्र संक्षिप्‍त का होईना आपल्‍या नजरेसमोरुन गेलेले नसते. हीच गरज श्री गंधर्व वेद प्रकाशनाने पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

या इतिहासप्रसिद्ध लोकांचा जीवनसंघर्ष वाचनीय असतो, रोमहर्षक असतो, अभूतपूर्व असतो. भले साहित्यिकदृष्ट्या उपमा, अलंकार, भाषेचा डौलदारपणा इत्‍यादी काही असेल किंवा नसेल पण मुळात त्‍यामागील आशय इतका अर्थपूर्ण असतो की ते साहित्‍य वाचनीय होते.

या पुस्‍तकामध्‍ये बाबासाहेबांच्‍या नेतृत्‍वाखालील बहिष्‍कृत हितकारिणी सभेचे पत्रक अतिशय वाचनीय आहे. त्‍यामधील माझ्या स्‍मरणार राहिलेली वाक्‍ये पु्ढीलप्रमाणे -

  • अनेक दिवसांपासून स्‍वतःस अयोग्‍य व अपवित्र मानून घेतल्‍यामुळे नैतिकदृष्‍ट्या बहिष्‍कृत लोकांमधील आत्‍मबल व स्‍वाभिमान ही जी उन्नतीची आद्य कारणे, ती अगदी लयास गेली आहेत. 
  • गरिबांस गरीबी तर नडतेच, पण त्‍यांच्‍या मार्गातील खरी अडचण म्‍हटली म्‍हणजे त्‍यांची शिथीलता व त्‍यांचे औदासिन्‍य. या शिथिलतेपासून व औदासिन्‍यापासून त्‍यांची सोडवणूक करण्‍यास त्‍यांच्‍यात चैतन्‍याचा व होत असलेल्‍या अन्‍यायाच्‍या चिडीचा संचार झाला पाहिजे.
  • बहिष्‍कृत वर्ग जरी गरीबीत आहे तरी त्‍यांच्‍यात देखील सामुदायिक प्रसंगी शेकडो रुपयांचा चुराडा होतो. लग्‍नसमारंभाच्‍या वेळी गरीबातले गरीब लोकही चुरशीस बळी पडतात व नसत्‍या डामडौलासाठी जेवणात व वरातील एकापेक्षा एक चढ होऊन पैशांची उधळपट्टी करतात. 
  • समाज ही एक नौकाच आहे व ज्‍याप्रमाणे आगबोटीत बसून प्रवास करणा-या उतारुने नुकसान करण्‍याच्‍या हेतूने जर का इतरांच्‍या खोलीस छीद्र पडलेले पाहिले व आपल्‍या विघ्‍नसंतोषी स्‍वभावामुळे किंवा नुसत्‍या बेगुमानपणामुळे ते छीद्र बुजवण्‍याचा प्रयत्‍न केला नाही, तर सर्व बोटीबरोबरच त्‍यालाही, आधी नाही मागाहून, जलसमाधी ही घ्‍यावी लागणारच, खितपत पडलेला बहिष्‍कृत समाज काही थोडाथोडाका नाही. अखिल हिंदुस्‍थानातील लोकसंख्‍येचा तो सहावा भाग आहे.
बाबासाहेबांनी आयुष्‍यभर लढाईचं केली. असे करतांना त्‍यांना फार मोठ्या दडपणांना सामोरे जावे लागले. यामुळे त्‍यांना अनेक वेळा जिवावर बेतणारे आजार झाले व या आजारांमधून ते अनेक वेळा सुहृदांच्‍या सेवेमुळे, सहकार्यामुळे व वैद्यकीय उपचार तसेच भीमासारखी इच्‍छाशक्‍ती या सर्वांच्‍या बळावर सुखरूप पणे बचावले. हे चरित्र वाचणे कठीण आहे. सतत संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. हे पुस्‍तक एका बैठकीत वाचता येत नाही. जसे     स्‍वा. सावरकरांचे माझी जन्‍मठेप सलग वाचणे शक्‍य होत नाही. तसेच हे पुस्‍तक देखील आहे.

आपल्‍या काही समजुती असतात, म्‍हणजे असे की बाबासाहेब म्‍हंटले की दलितांविषई काही तरी असणार पण असे चरित्रग्रंथ वाचल्‍याने आपल्‍या समजुती वास्‍तवाशी पडताळून पाहता येतात. बाबासाहेबांच्‍या समाजोन्नतीच्‍या कार्यामध्‍ये अनेक सवर्ण देखील सामील होते ही नवीनच माहिती आपल्‍याला या पुस्‍तकामधून मिळते. 

आपण ज्‍या समाजात राहतो, त्‍या समाजामध्‍ये पूर्वी घडून गेलेल्‍या मोठमोठ्या घडामोडी आपल्‍याला माहिती असणे आवश्‍यक आहे आणि या दृष्‍टीने देखील हे पुस्‍तक वाचणे आवश्‍यक आहे.





No comments: