Friday, December 30, 2011

स्‍थल-काल

पुस्‍तकाचे नावः स्‍थल-काल
लेखक/संकलकः अरुण टीकेकर
मौज प्रकाशन
पहिली आवृत्ती - 1 फेब्रुवारी 2004
मूल्‍य रु. 650/-

मुंबईचा स्‍थानिक इतिहास, पुण्‍याचा स्‍थानिक इतिहास आणि एकूणच महाराष्‍ट्रामधील अनेक स्‍थळांचा स्‍थानिक इतिहास या पुस्‍तकामध्‍ये छोट्या-छोट्या लेखांच्‍या स्‍वरुपात दिला आहे. आपल्‍याला या छोट्या छोट्या गोष्‍टींविषई नकळतपणे कुतुहल असते. 

बघा इतिहास म्‍हणजे राज्‍यकर्ते, लढाया, जय-पराजय हे आहेच पण त्‍याचबरोबर स्‍थानिक इतिहास हा त्‍या त्‍या ठिकाणी राहणा-या लोकांना आपल्‍या प्रेमात पाडतो. मुंबईत राहणारी लोकं चर्चगेट येथे अनेक वेळा जात-येत असतील पण फ्लोरा फाउंटनच्‍या जवळच्‍या परिसरामध्‍ये असणारी एक ऐतिहासिक विहीर एका पारशी माणसाने इ.स. 1732 च्‍या सुमारास बांधली होती, हे कळल्‍यावर आपल्‍याला आनंद होतो. (मुसलमान असल्‍याची शंका आल्‍यामुळे या पारशी माणसाला मराठ्यांनी पकडले होते. आपण पारशी असल्‍याची खात्री पटवून देऊन तो मराठ्यांच्‍या तावडीतून सहीसलामत सुटला. याकरिता काही दानधर्म करावा या हेतूने त्‍याने चर्चगेट परिसरामध्‍ये एक विहीर खोदवून घेतली. आजदेखील ही विहीर सुशोभित आहे. या विहीरीच्‍या आजूबाजूला सुशोभिकरणासाठी केलेले बांधकाम आहे तसेच या बांधकामावर रंगित काचा बसविल्या आहेत व या बांधकामावरुन सुंदर वेली सोडल्‍या आहेत. येणा-या जाणा-यांना बसण्‍यासाठी लाकडी बाके आहेत.)

ब्रिटिशांच्‍या विजयाबरोबर भारतीय समाजामध्‍ये नवनवीन संस्‍था उभ्‍या राहू लागल्‍या. आधुनिक शिक्षणाची दारे सर्वांना खुली होऊ लागली. रेल्‍वे मार्ग बांधले गेले, वर्तमानपत्रे सुरु झाली या सर्वांचा हा इतिहास आहे. तसेच समाजाला नवीन दिशा देणा-या भारावलेल्‍या लोकांचा हा इतिहास आहे. 

हा स्‍थानिक इतिहास वाचतांना या पुस्‍तकामधील संदर्भ गूगलमध्‍ये पाहिले तर आणखी मनोरंजक माहिती मिळते. गूगल इमेजेस मध्‍ये स्‍थानिक इतिहासाशी संबंधित सुंदर चित्रे व फोटो सापडतात.

एकूणच इंटरनेटच्‍या साथीने हे पुस्‍तक वाचल्‍यास आपले स्‍थानिक इतिहासाचे ज्ञान अद्ययावत होते.

No comments: